राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) ४४व्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व राज्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०२३- २४ या वर्षामध्ये सर्व निकषांवर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सदर पुरस्कार जिल्हा बँकेस प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार केंद्रीय सहकार तथा नागरी विमान उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी स्वीकारला. पुरस्कार वितरण सोहळा दि. १९ जुलै रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला सहकार विभागाचे अतिरिक्त सचिव प्रवीण दराडे, ‘नाबार्ड’चे उपकार्यकारी संचालक गोवर्धन रावत, सहकार आयुक्त दीपक तावरे, नाबार्ड महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय पुणेच्या मुख्य महाप्रबंधक रश्मी दराड आदी मान्यवर उपस्थित होते.
बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे संचालक मंडळ यांनी या पुरस्काराचे श्रेय बँकेचे ग्राहक, कर्मचारी व अधिकारी यांना दिले आहे.